मी आयोगाच्या निर्णयावर…
विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदा घेत 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर केला आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (ता.4 नोव्हेंबर) ही घोषणा केली. पण आता नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारानंही धक्कादायक विधान केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगावर (State Election) जोरदार शाब्दिक हल्ले चढवले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांमधील घोळ आणि मतचोरीचा मुद्दा वादळी ठरत आहे. पण आता विरोधकांना झटका देत निवडणूक आयोगानं थेट 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणाच केल्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.
आपल्या वादग्रस्त विधानं, मारहाणीच्या घटनांनी नेहमीच वादात सापडणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आता राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होताच खळबळजनक विधान केलं आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. मात्र, दुबार मतदारांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयावर आपण समाधानी नसल्याचे जाहीर भूमिका घेतली आहे.
ते म्हणाले, एकट्या बुलढाण्यात हजारो मतदारांची नावे दुबार आहेत, तर राज्यातील लाखो मतदारांकडून निवडणूक आयोग हमीपत्र घेणार आहे का? असा खडा सवालही शिवसेनेचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.याचदरम्यान,त्यांनी दुबार मतदारांची ही नावे डिलीट केली असती, तर बरं झालं असतं आणि दहा दिवस निवडणुका उशिरा घेतल्यास तर काय बिघडलं असतं असं म्हणत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपण समाधानी नाही असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या राजकारणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे आले, तरी ग्रामीण भागात त्याचा प्रभाव पडणार नाही. पण याचबरोबर त्यांनी मुंबई पुण्याकडे महाविकास आघाडीला राज ठाकरेंमुळे थोडाफार फायदा होण्याची शक्यताही आमदार गायकवाड यांनी वर्तवली आहे.
महाविकास आघाडीसह राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनीही निवडणूक आयोगाला फैलावर घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहिल अशी साद घातली आहे. तसेच मतदान याद्यांमध्ये हजारो दुबार मतदारांची नावे आहेत. मतदानयादी आधी पारदर्शक करा आणि नंतर मतदान घ्या अशी जोरदार मागणी केली होती. यासाठी सत्याचा मोर्चाही काढण्यात आला होता. पण एवढं सगळं आटापिटा करुनही विरोधकांच्या दबावाला न जुमानता आयोगानं 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.


