जाणून घ्या पुणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया…
गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर होणार असून, या निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. पंचायत जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका यामधील सुरूवातीला राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
यामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्प्यातील निवडणूक होत असून, यासाठी ३ डिसेंबरला मतदान तर ४ डिसेंबर या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायत यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यामध्ये बारामती, लोणावळा, चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर या पाच ठिकाणी तीन सदस्यांचा प्रभाग असून उर्वरित नऊ ठिकाणी दोन सदस्यांच्या प्रभागानुसार मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
महत्वाची माहिती थोडक्यात
या निवडणुकीतून थेट नगराध्यक्ष निवडले जातील.
७३० मतदान केंद्रांवर मतदान करण्यात येईल.
एकूण १४ नगर परिषदांमध्ये ३४७ प्रभाग आहेत, तर तीन नगर पंचायतींमध्ये ५१ प्रभाग आहेत.
या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल.
१४ नगर परिषदांसाठी ५ लाख ७९ हजार १९९ मतदार आणि तीन नगर पंचायतींसाठी ५५ हजार ७४१ मतदार आहेत.
जिल्ह्यात एकूण ६ लाख ३४ हजार ९४० मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
प्रत्येक केंद्रावर साधारणपणे ९०० ते १००० मतदारांसाठी व्यवस्था असेल.
नगर पंचायतींसाठी १००० ते ११०० मतदारांमागे एक केंद्र असेल.
३१ ऑक्टोबर रोजी मतदार यादी अंतिम झाली असून, मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल.
या ठिकाणी पहिल्यांदाच होणार निवडणूक
फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषद आणि मंचर, माळेगाव या नगर पंचायतींची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.


