गणेश बिडकर निवडणूक प्रमुख; मोहोळ यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी !
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जिल्हा निवडणूक प्रमुख व निवडणूक प्रभारींची नियुक्ती बुधवारी केली. त्यात पुणे जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय सहकारमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आली आहे.
पुणे शहर महापालिका निवडणूक प्रमुखपदी माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. बिडकर हे माजी नगरसेवक असून त्यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेते पद सांभाळले आहे.
भाजपकडून कसबा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी ते दोनवेळा इच्छुक होते.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या रखडलेल्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजपकडून संघटनात्मक बांधणीसह पक्षाकडू नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पक्षाकडून बुधवारी जिल्हा निवडणूक प्रमुख व निवडणूक प्रभारींची नियुक्ती जाहीर केली. त्यात, पुणे जिल्ह्यात पुणे उत्तर ( मावळ)ची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्यावर असणार आहे.
पुणे दक्षिण ( बारामती) जबाबदारी आमदार राहूल कुल यांच्याकडे दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी शंकर जगताप यांच्याकडे दिली आहे. शहरासह जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून खासदार मोहोळ निवडणुकांची जबाबदारी सांभळणार असल्याने पुणे जिल्ह्यात भाजप मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुकांना सामोरे जाणार आहे.


