ठाणे जिल्ह्यातील 6 पालिकांमध्ये थेट सामना होणार !
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आघाडी घेत नेत्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारीची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील 6 महापालिकांच्या निवडणूक प्रभारीची जबाबदारी एकनाथ शिंदेंचे कट्टर विरोधक गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.
गणेश नाईक वनमंत्री आहेत. मात्र, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंसोबत युती नको, अशी थेट भूमिका त्यांनी घेतली होती. भाजप स्वबळावर जिंकेल शिंदेंची गरज नाही, असे म्हणत ते सातत्याने शिंदेंना डिवचत आहेत. त्यातच त्यांना आता थेट निवडणूक प्रभारीची जबाबदारी मिळाल्याने नाईकांच्या विरोधाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.
ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर या शहरांच्या निवडणुकीची जबाबदारी गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. आणि या शहरांसाठी निवडणूक प्रमुख देखील नेमण्यात आले आहेत. ठाणे शहराची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी आमदार संजय केळकर यांच्याकडे असणार आहे.
रावणाचा अहंकार जाळा…
गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात आयोजित बैठकीत नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका करत रावणाचा अहंकार जाळा, असे आवाहन केले होते. तसेच नवी मुंबई महापालिका आपण स्वबळावर जिंकली होती तशीच ठाणे महापालिका देखील आपण स्वबळावर जिंकू शकतो, असे म्हटले होते.
ठाणे, नवी मुंबईत स्वबळाचा नारा
आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाणे आणि नवी मुंबईसाठी भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. अंबरनाथ पालिकेत देखील भाजपने स्वबळाची तयारी पूर्ण केली आहे. महायुतीची वाट न पाहता कामाला लागा, असे संदेश भाजपच्या वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईत भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना असा थेट सामना होण्याची शक्यता आहे.


