आधी भाजप नंतर जवळच्या मित्र पक्षानेच दिला दगा !
आठवड्याभरात शरद पवार यांना दुसरा मोठा धक्का बसला आहे. आधी भाजपने त्यांना झटका दिला होता. नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी आहे.
त्याआधी मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरु आहे. खासकरुन महाविकास आघाडीमधले नेते, पदाधिकारी, सत्ताधारी महायुतीमध्ये प्रवेश करतायत. आता महाविकास आघाडीतील पक्षानेच शरद पवार यांना धक्का दिला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या काळात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसने दिला. धाराशिव मधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दोन वेळा तुळजापूर विधानसभा लढविलेले अशोक जगदाळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. जगदाळे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नळदुर्ग नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार असल्याचा निर्धारही जगदाळे यांनी बोलून दाखवला आहे.
फॉर्म्युला काय ठरलाय?
काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अशोक जगदाळे यांनी, नळदुर्ग नगरपालिका निवडणूक भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असं जाहीर केलय. काँग्रेस नगराध्यक्ष पदासह 18 जागा तर शिवसेना उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 1 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी ही मोठी खेळी
दोन-तीन दिवसांपूर्वी सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला होता. सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच माजी नगरसेकांनी भाजपत प्रवेश केला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी ही मोठी खेळी आहे. सोलापूरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचा मुलगा प्रथमेश कोठे यांच्यासह पूर्ण गटाने भाजपमध्ये प्रवेश केला.
पाच माजी नगरसेवक फोडले
भाजपने शरद पवार गटाचे पाच माजी नगरसेवक फोडले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


