भाजपच्या बड्या नेत्यासाठी शशिकांत शिंदेंच्या पायघड्या…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभेद असणारी महायुती तुटली असून महाविकास आघाडीतही अलबेल असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजप शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवाय येथे मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील झाल्याचे दिसून येत आहे. अशातच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाच नुकताच भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत आलेल्या उमेदवाराच्या नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडण्या लावाव्या लागल्याचे समोर आले आहे. यामुळे येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमक काय सुरूय असा प्रश्नच विचारला जात आहे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार तयारी करत कंबर कसली. भाजपने पूर्ण तयारी करत उमेदवार फिक्स केले. पण त्याच वेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दोनच दिवसांपूर्वी(17 नोव्हेंबर) प्रवेश केला.
त्यांनी प्रवेश करताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लगेचच सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना जाहीर केली. त्यामुळे पालिकेत भाजपच्या दोन्ही राजेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापुढे आव्हान निर्माण केले होते.
पण सोमवारी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असतानाच महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे समोर आले. यामुळे राष्ट्रवादीसह ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस समोर पेच निर्माण झाला होता. पण रविवारी रात्रीपासून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करून तोडीस तोड उमेदवार देण्याबाबत डावपेच आखले होते.
सुवर्णा पाटील यांनी आधी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी सोमवारी सातारा येथे नगराध्यक्षपदासाठी मुलाखत दिली आणि तातडीने थेट मुंबई गाठली. त्या मुंबईत तळ ठोकून होत्या, अशी चर्चाही साताऱ्यात होती. पण रविवारी दुपारी नगराध्यक्षपदासाठी अमोल मोहिते यांचे नाव जवळपास निश्चित झाले.
यानंतरच सुवर्णा पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यावर शशिकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासोबत चर्चा करून सुवर्णा नरेंद्र पाटील यांना उमेदवारी निश्चित केली.
यावेळी काँग्रेसचे बाबासाहेब कदम, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. दत्तात्रय धनवाडे, शिवसेनेचे नरेंद्र पाटील उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार म्हणून सुवर्णा पाटील यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.


