त्याला पार्थ सारखं…
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने पहिल्यांदाच निवडणूत होत आहे.
त्यामुळे नुकतेच राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या राजन पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. अनगर नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडणूक होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जातील त्रुटींमुळे उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी उत्साहाच्या भरात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर इशारा दिला. यानंतर राजकीय वातावरण तापलेले असताना राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांची माफी मागितली आहे.
राजकीय नाट्यानंतर अखेर अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अनगर नगराध्यक्षपदासाठी ३ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्जच बाद झाल्याने या निवडणुकीला वेगळं वळण लागलं. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी थिटे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. त्यानंतर सूचकाची सही नसल्याने थिटे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे शेवटी ही निवडणूक बिनवरोधत झाली आहे. मात्र या विजयाच्या उत्साहात बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांना आव्हान दिलं होतं. अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही, असा इशारा बाळराजे पाटील यांनी दिला. या सगळ्या प्रकारावर राजन पाटील यांनी माफी मागितली आणि मोठ्या मनाने हा विषय संपवण्याची विनंती केली.
आमच्या गावात कधीच निवडणूक झाली नाही. तरुण पोरं थोडी उत्साही असतात. निवडणूक झाल्यामुळे त्यांनी तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमच्या मुलाने जे वक्तव्य केले त्याचे मी समर्थन करणार नाही. राजकारणात तो लहान आहे. त्यांच्या तोंडून नकळत अशा प्रकारचे वक्तव्य गेलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज मी त्यांच्यापासून दूर गेलो त्याला अजित पवार कारणीभूत आहेत असं मी म्हणणार नाही. मी त्यांचे नेतृत्व मान्य केलं. आतापर्यंत जे वैभव उभं केलं त्यामध्ये शरद पवार आणि अदित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. मुलाच्या तोंडून जे काही अपशब्द आले ते नको व्हायला होते. त्याबद्दल मी अजित पवार आणि पवार कुटुंबाची दिलगिरी व्यक्त करतो. क्षमा व्यक्त करतो. माझी विनंती आहे की हा विषय इथे थांबवावा, असे राजन पाटील म्हणाले.
एखादा मुलगा चुकला तर त्याला पदरात घ्यायचं असतं. अजित पवारांनी त्याला पार्थ आणि जय पवार यांच्यासारखे समजावे. ही विनंती मी त्यांना करतो. भावनेच्या भरात मुलांसमोर बोलताना त्याच्या तोंडून तो शब्द गेला. मुलाने मांडीवर घाण केली तर आई मांडी कापत नाही. तुम्ही मोठ्या मनाने हा विषय संपवून टाकावा, असेही राजन पाटील म्हणाले.


