ऐन निवडणुकीपूर्वी ठाण्यातलं वातावरण तापलं !
उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या प्रंचड धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे एकमेकांचे पदाधिकारी फोडल्याचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे.
तर आता दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच भाजप आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकाने थेट शिंदेंच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची माहिती मसोर आली आहे.
या राड्यानंतर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडीक, शाखाप्रमुख महेश लहाने आणि उपविभागप्रमुखाला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
गुरूवारी (ता.20) रात्री बीएसयूपी घरांना शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्याच्या निर्णयाचं स्वागत आणि सेलीब्रेशन करण्यासाठी शिंदेंचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीत आले होते. तर पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये असेच सेलिब्रेशन केलं जाणार होतं.
मात्र भाजपच्या माजी नगरसेवकाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांन कसे सेलिब्रेशन करता? असे विचारात मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर शिंदेंच्या पदाधिकारी, कार्यकर्कत्यांनी मोठी गर्दी केली होती.
भाजपच्या दादागिरीला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेतील वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे.


