स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकिकडे नात्यांमध्येही दुफळी निर्माण झालेली असताना महायुतीसुद्धा इथं अपवाद ठरत नाहीये. या निवडणुकीमध्ये महायुतीत असणारा मतभेद जाहीरपणे अनेक प्रसंगी समोर आला असून, अशीच आणखी एक घटना हिंगोलीत पाहायला मिळत असून, तिथं कुरघोडीच्या राजकारणानं राजकीय उलथापालथ केल्याचं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील एकमेकांच्या लोकांना पक्षात घेऊ नका असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही हिंगोलीमध्ये मात्र याउलट चित्र पाहायला मिळालं. जिथं, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपला धक्का देत भाजपचा उमेदवार रातोरात पळवला. प्रभाग क्रमांक 16 ब मधील भाजपचे उमेदवार भास्कर बांगर यांना आमदार बांगर यांनी फोडत, शिवसेनेत प्रवेश दिला.
भास्कर बांगर हे शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांच्या विरोधात निवडणूक लढत होते, पण आता त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देत आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीत राजकीय कल्लोळ सुरू झाला आहे हे नाकारता येत नाही.
रवींद्र चव्हाणांच्याच कृतीची इथं पुनरावृत्ती…
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणल्यानंतर एकनाथ शिंदे यांची स्पष्ट नाराजी पाहायला मिळाली होती. ज्यानंतर आता त्याचीच पुनरावृत्ती हिंगोलीत झाली असून, अप्रत्यक्षरित्या शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला धक्का दिला आहे असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान फोडाफोडीच्या या राजकारणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली दरबारी भेट घेतली. जिथं त्यानी महायुती, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आलेले पक्षप्रवश या मुद्द्यांवर चर्चा केल्याचं म्हटलं गेलं. चव्हाण हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत असल्याची तक्रार शिंदेंनी केली आणि त्यामागोमागच शिंदेंच्या पक्षातील नेत्यानं भाजपचा उमेदवारच पळवला. ज्यामुळं ही राजकीय खेळी चर्चेचा विषय ठरली.


