मनसेमुळे मोठी उलथापालथ ?
मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सध्या वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. सत्ताधारी महायुतीचे तिन्ही पक्ष ही निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत. विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मात्र बरेच मतभेद आहेत.
महाविकास आघाडीमध्ये कोण एकत्र येणार आणि कोण वेगळी चूल मांडणार हे अद्याप समजू शकलेले नाही. काँग्रेस पक्षाने तर मनसे सोबत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार नाही, असे जाहीरपणे बोलून दाखवलेले आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या एका ट्विटने खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी काँग्रेसला चांगलेच सुनावले असून काहीही झालं तर ठाकरे गट आणि मनसे हे एकत्रच लढतील, असंच सूचित केलं आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
खासदार संजय राऊत प्रकृती बिघडल्याने सध्या सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. असे असले तरी राज्यातील राजकारणात काय-काय घडतंय, याकडे त्यांचं बारिक लक्ष आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे सोबत असेल तर आम्ही ठाकरेंशी युती करणार नाही, असे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर आता संजय राऊत सक्रीय झाले आहेत. त्यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ठाकरे गटाची भूमिका थेट सांगून टाकली आहे. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसे पक्षाला आघाडीत घेणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे मत आहे. हा काँग्रेस पक्षाचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. पण शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत. लोकांची हीच इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी थेटपणे सांगून टाकले आहे.
काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार?
सोबतच त्यांनी काँग्रेसला सुनावलं आहे. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आल आहेत. त्यासाठी कुणाचा आदेश किंवा कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. यासह खासदार शरद पवार आणि डावे पक्षसुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा, असे म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षानेही सोबत यावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, मनसे सोबत असल्यास ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका समोर आल्यानंतर खासदार शरद पवार यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे. ठाकरे, मनसेसोबत आघाडी करण्याबाबत शरद पवार सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. असे असताना आता काँग्रेस आपल्या निर्णयात बदल करणार का? मुंबईची पालिका निवडणूक महाविकास आघाडी एकदिलाने लढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


