निवृत्तीनंतर सरन्यायाधीश गवईंची मोठी घोषणा !
दिल्ली: मला हिंदूविरोधी म्हटलं जाणं पूर्णपणे चुकीचं आहे, असं माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी म्हटलं आहे. बी. आर. गवई नुकतेच निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
निवृत्तीनंतर सरकारकडून कोणतंही पद घेणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. राजकारणात येण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी द्वेषपूर्ण भाषणं, बुलडोझर जस्टिस, न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचार, राजकारणात येण्याची शक्यता अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं. भूषण गवई यांच्यावर सुनावणी सुरु असताना एका वकिलानं बूट फेकला होता. त्यावरही गवई बोलले. ‘बूट फेकल्याचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्या मागे काय हेतू होता, ते मला माहीत नाही. मला हिंदू विरोधी म्हणणं पूर्णपणे चुकीचं होतं,’ असं गवई म्हणाले.
बूट फेकण्याच्या घटनेनंतर मी न्यायालयातील माझ्या टिप्पणींबद्दल अधिक सतर्क झालो. कारण माझी विधानं सोशल मीडियावर मोडून तोडून दाखवली गेली. न्यायालयाकडून केल्या जाणाऱ्या टिप्पणांच्या सोशल मीडियावरील वार्तांकनाला काहीतरी नियम असायला हवेत, अशी गरज त्यांनी बोलून दाखवली. द्वेषपूर्ण भाषणं रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याची गरज आहे. कारण द्वेषपूर्ण भाषणांमुळे समाजात दरी निर्माण होते. त्यामुळे या प्रकरणी कठोर कायदा असायला हवा, असं गवई यांनी म्हटलं.
सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त झाल्यावर सरकारी पद स्वीकारणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर गवईंनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलं. राज्यपाल किंवा राज्यसभेची उमेदवारी स्वीकारणार नाही, असं गवई म्हणाले. पण त्यांनी राजकारणात येण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली नाही. न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्याची जबाबदारी संसदेची आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास आणि शिक्षेची प्रक्रिया वेगवान आणि प्रभावी करण्याची जबाबदारी संसदेची असल्याचं गवईंनी म्हटलं.
बुलडोझर जस्टिसबद्दलची भूमिकाही त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली. ‘कायद्याचं शासन बुलडोझर शासनाच्या वर असायला हवं,’ असं माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले.


