हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर रोहित पवारांच्या शिलेदारावर अख्ख विधीमंडळ संतापलं !
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या शिलेदाराने विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह सभागृहाविषयी वादग्रस्त विधान केलं.
हिवाळी अधिवेशनापूर्वीच रोहित पवार यांच्या शिलेदाराने जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत केलेल्या विधानामुळे विधानपरिषदेच्या आमदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विधानपरिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय व प्रवीण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत, आमदार पवार यांचे समर्थक सूर्यकांत मोरे यांच्याविरोधात विशेषाधिकाराची सूचना मांडली आहे. यावरून जामखेडची निवडणूक पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आली आहे.
जामखेड नगरपरिषदेची निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. यावरून समर्थक एकमेकांवर जोरदार हल्ला चढवत आहेत. यातच रोहित पवार यांचे समर्थक सूर्यकांत मोरे यांनी राम शिंदे यांच्यावर टिका करताना, विधानपरिषदेच्या सभागृहाविषयी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे विधानपरिषदेच्या सदस्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
भाजपचे (BJP) विधानपरिषदेतील सदस्य श्रीकांत भारतीय व प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेचे सदस्य, सभापती आणि सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सूर्यकांत मोरे यांच्या विरोधात विशेषाधिकाराची सूचना मांडली. यानुसार विधानमंडळ सचिवालयाकडून नोटिस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी मोरे यांनी दोन डिसेंबरपर्यंत लिखित खुलासा सादर करावा, अशा सूचना नोटिसीद्वारे विधानमंडळ सचिवालयाच्या अवर सचिव संगीता विधाते यांनी केल्या आहेत.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीनिमित्त रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या प्रचारसभेदरम्यान सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेचे सदस्य, सभापती, विधानपरिषद व सभागृह यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. ही बाब गांभीर्याने घेत विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय आणि प्रवीण दरेकर यांनी विशेषाधिकाराची सूचना मांडली.
मोरे यांच्यावर विशेषाधिकार भंग कारवाई प्रस्तावित करण्याची सूचना विधिमंडळात सादर करण्यात आली. यापुढे भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि सभागृहाची प्रतिष्ठा सुरक्षित राहावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत सचिवांनी मोरे यांना खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सूर्यकांत मोरे नेमकं काय म्हणाले
‘राम शिंदे उडालेल्या बल्बचे (आमदारांचे) सभापती असून त्यांच्या पेक्षा पंचायत समितीचा सभापतीला जास्त अधिकार असतात. वर्षातील 365 दिवसांपैकी अवघे 30 दिवसच यांचे काम असते. बाकी 335 दिवस लालदिव्याची गाडी आणि सोबत लवाजमा घेऊन मिरवायचे पद म्हणजे, विधान परिषदेचे सभापती होय. इकडे सांगायचे की मी 288 आणि विधान परिषदेचे 75 आमदारांचा हेडमास्तर आहे. वास्तविक पाहता ते फक्त 70 किंवा 75 आमदारांचे ते पण उडालेले बल्बचे सभापती आहे. इतर कोट्यातून आलेल्या आमदारांचेच ते सभापती आहे,’ अशी जोरदार टीका सूर्यकांत मोरे यांनी केली होती.
यांच्याकडे सदस्य मोजण्याचं काम
‘कायदे हे विधानसभेत, लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी बनतात. यांनी फक्त ते त्यांच्या सभागृहात पारित करायचे आणि त्यावर त्यांच्या सभागृहाच्या आमदारांचे मत घ्यायचे. बाजूने किती मतदान? आणि विरोधात किती मतदान? मोजण्याचे काम सभापतीचे आहे,’ असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सूर्यकांत मोरे यांनी जामखेडच्या प्रचार सभेत केला होता.
हे पडले, तिकडे जाऊन रडले…
आमदार रोहित पवारांनी याच राम शिंदेंचा विधानसभेच्या निवडणुकीत दोनदा पराभव केला. दोन्ही वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन रडले. पहिल्यांदा विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडली. तर दुसऱ्यांदा चारी मुंड्या चित केल्यानंतर पुन्हा रडत सभापतीपद मिळवले. रन किती निघाले आणि किती नाही. पण पठ्ठ्याने म्हणजे आमदार रोहित पवारांनी मॅच जिंकली हे वास्तव आहे. सभापती असून मंत्र्यांच्या दारात जाऊन यांना निधी आणावा लागतो. हे सत्य राम शिंदेंनी नाकारू नये, असेही सूर्यकांत मोरे यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.


