महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करत मुंबईकर आणि एमएमआर रिजनमधील नागरिकांना सतर्क केले आहे. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं.
त्यावरुन राज ठाकरे यांनी भाजपच्या मनात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारने चंदिगड या केंद्रशासित शहराबद्दलच्या न घेतलेल्या एका निर्णयाचीही आठवण करुन दिली. त्यामुळे चंदिगडबद्दल केंद्र सरकार काय निर्णय घेणार होते, आणि त्याचा मुंबईवर काय परिणाम होणार याची चर्चा सुरु झाली.
ज्याप्रमाणे मुंबई महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे. 106 जणांनी हौतात्म्य पत्करले, अनेक आंदोलने झाली आणि त्यांनतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. चंदिगड देखील पंजाबसाठी अस्मितेचा मुद्दा आहे. केंद्र सरकारने आगामी हिवाळी अधिवेशनात चंदिगड संबंधी एक विधेयक आणण्याची तयारी केली होती. ज्यामुळे चंदिगडचे प्रशासनिक अधिकार हे राज्यपाल आणि पर्यायाने पंजाब सरकारला न राहता ते राष्ट्रपतींना दिले जाणार होते.
चंदिगड शहर पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी आहे. मात्र पंजाबचे चंदिगडसोबत अधिक जवळचे संबंध आहे. त्यामुळे पंजाबमधील सर्वच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या या प्रस्तावित विधेयकाला कडाडून विरोध केला. भारतीय जनता पक्षही या विरोधात सहभागी झाला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले. सध्याच असा काही निर्णय घेतला जाणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
पंजाबमध्ये सध्या आम आदमी पार्टीची सत्ता आहे. 2027 मध्ये येथे विधानसभा निवडणूक प्रस्तावित आहे. शिरोमणी आकाली दलापासून विभक्त झाल्यापासून भाजपची पंजाबातील स्थिती बिकट आहे. मागील निवडणुकीत भाजपचे फक्त दोन उमेदवार विजयी झाले होते. भाजपने चंदिगडचे अधिकार राष्ट्रपतींनी देण्याचा निर्णय घेतला असता तर आगामी विधानसभा निवडणुकीत याचे विपरतीत परिणाम दिसून आले असते, त्यामुळेच तुर्तास हा निर्णय मागे घेण्यात आला.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. ‘मुंबई’ नको ‘बॉंबे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !


