सिध्दरामय्यांच्या विश्वासू नेत्यांनीही बदललं पारडं?
कर्नाटकात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे. मागील काही महिन्यांपासून नोव्हेंबर महिन्यात मोठी राजकीय क्रांती होणार असल्याचा दावा काँग्रेसमधील काही नेत्यांकडूनच केला जात होता.
त्याअनुषंगाने मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग आला आहे. पण मुख्यमंत्री सिध्दरामय्यांसह या पदाच्या रेसमध्ये असलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमारही मागे हटण्यास तयार नाहीत.
सिध्दरामय्या यांनी आपणच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू, असे म्हटले आहे. तर शिवकुमारही त्यावर उघडपणे फारसे बोलायला तयार नाहीत. या मुद्द्यावर सार्वजनिकपणे बोलायचे नाही. कारण हा पक्षाच्या चार-पाच लोकांमधील एक सीक्रेट डील आहे, असे म्हटले शिवकुमार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यावरून राज्यात घमासान सुरू झाली आहे.
राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्यूला ठरला दावा शिवकुमार समर्थक आमदारांकडून केला जात आहे. त्यानुसार काही आमदारांनी दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेत त्यांच्याकडे मुख्यमंत्री बदलाची मागणी केल्याचे समजते. त्यातच आता सिध्दरामय्या यांच्या गोटातील नेत्यांनी तलवार म्यान करण्यास सुरूवात केल्याने पुढील काही दिवसांत कर्नाटकात मोठा फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत.
कर्नाटकचे गृहमंत्री डी. परमेश्वरा यांनी थेट शिवकुमार यांना पाठिंबा देण्याबाबत विधान केले आहे. ते सिध्दरामय्या यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्रिपदाबाबत मला विचारले तर मीही या रेसमध्ये आहे. पण पक्षाच्या निर्णयानुसार बदल होत असेल आणि डीके मुख्यमंत्री होणार असतील तर आम्ही त्याचा स्वीकार करू.
सिध्दरामय्या यांच्याकडून कॅबिनेटमधील फेरबदलाच्या हालचाली सुरू आहेत. पण शिवकुमार हे आधी मुख्यमंत्रिपदामध्ये बदल करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. पक्षनेतृत्वाने मुख्यमंत्री न बदलता इतर मंत्र्यांमध्ये बदल केल्यास सिध्दरामय्या हे कार्यकाळ पूर्ण करतील, हे स्पष्टच आहे. पण त्यानंतर शिवकुमार काय भूमिका घेणार, हे महत्वाचे ठरणार आहे.
डी. के. शिवकुमार यांच्याकडून सध्या कोणतेही आक्रमक भूमिका घेण्यात आलेली नाही. ते सातत्याने सिध्दरामय्या यांच्या पाठिशी आपण उभे असल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांच्या समर्थक आमदारांकडून जोरदार फिल्डींग लावली जात आहे. अर्थातच त्यामागे शिवकुमार यांचाच हात असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, अद्याप पक्षनेतृत्वाकडून त्यांना दिल्लीत बोलावणे आलेले नाही. सिध्दरामय्या यांनी नुकतात दिल्ली दौरा केला आहे. यापार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असणार आहे.


