भरारी पथकाकडून झाडाझडती; महायुतीतील सेना-भाजप वाद विकोपाला ?
नगरपालिका निवडणुकीमुळे सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद ठिकठिकाणी टोकाला जाताना दिसत आहे. अशातच काल (30 नोव्हेंबर) रात्री सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला आहे . यावेळी कार्यालया ची झाडाझडती घेतल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते मात्र संतप्त झाले आहेत.
सेना भाजप वादाचा पुढचा अंक
सांगोल्यात भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या युतीने शहाजी बापूंना एकटे टाकले आहे. यातूनच अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शहाजीबापूंनी सांगोल्यातून मोठी आघाडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच काल ( रविवारी) दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात सभा झाली होती. या सभेत फडणवीस यांनी बापूंवर कोणतीही टीका केली नसली तरी शेकाप बरोबर झालेल्या युतीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.
शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढणार?
यालाच उत्तर देण्यासाठी शहाजी बापूं यांनी काल रात्री सांगोल्यात विराट सभा घेतली. ही सभा संपताच शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. याच पद्धतीने बापूंच्या जवळ असणाऱ्या इतरही काही ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. या छाप्यात नेमकी काय सापडले? याबाबत अजून काहीही माहिती समजली नसली तरी राज्यात सत्ता असताना अशा पद्धतीने मित्र पक्षाच्या नेत्यावर टाकलेल्या छाप्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढणार आहे.
सांगोल्यात चुरशीचीलढत, युतीने शहाजी बापूंना एकटे टाकले?
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलं आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील हे नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही आपण प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला 15 हजारांचे मताधिक्य दिलं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला.
