दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा औंध प्रतिनिधी -निहाल मणेर
औंध: राजकारणात कधी शब्दांचा गदारोळ असतो, तर कधी कृतीची शांत पण खोलवर रुजणारी चाहूल. औंध जिल्हा परिषद गटात सध्या अशीच एक शांत, संयमी पण आशयघन विकासयात्रा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घरोघरी जाऊन थेट जनतेशी संवाद साधत आहेत. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने प्रचारात आक्रस्ताळेपणा नाही; उलट त्यांच्या आठवणींनी प्रेरित होऊन, जनतेच्या अडीअडचणी ऐकणारा, समजून घेणारा आणि उपाययोजनांची वाट दाखवणारा प्रचार आकार घेत आहे. या संवादातूनच औंध गटासाठी विकासाचे पर्व एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा दृढ मानस उमेदवारांनी केला आहे. औंध गटाच्या उमेदवार मनीषाताई फडतरे यांनी केवळ घोषणांपुरते न थांबता, आजवर दुर्लक्षित राहिलेल्या पण विकासदृष्टीने अत्यावश्यक असलेल्या घटकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि महिला-सक्षमीकरण या सर्व बाबी त्यांच्या विकासदृष्टीच्या केंद्रस्थानी आहेत.
औंधच्या राजकीय-सामाजिक प्रवाहाला दिशा देणाऱ्या श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनातून औंध गटाचा विकासरथ पुढे नेण्याची जबाबदारी मनीषाताई फडतरे यांनी समर्थपणे स्वीकारली आहे. अनुभवाची शिदोरी आणि नव्या विचारांची धार या संगमातून औंध गटासाठी स्थैर्य, सातत्य आणि परिणामकारक विकासाचा मार्ग स्पष्ट होताना दिसतो. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि राणीसाहेबांच्या साथीने औंध व परिसरात कोट्यवधींची विकासकामे झाली, ही कामे आजही जनतेच्या मनात ताजी आहेत. त्या कामांची साक्षच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आणि उमेदवारांबद्दल आपलेपणाची भावना अधिक घट्ट करत आहे. ही भावना केवळ स्मृतींवर नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवांवर उभी आहे.
औंध गणातील उमेदवार शुभम शिंदे आणि सि. कुरोली गणातील उमेदवार मनोज देशमुख या दोन तरुण, उमद्या नेतृत्वाचा उदय राणीसाहेबांच्या छत्रछायेखाली होत आहे. तडफदार विचार, कामाची गती आणि लोकांशी थेट नाळ या त्रिसूत्रीवर त्यांनी विकासाचा झेंडा हाती घेतला आहे. तरुणाईची ऊर्जा आणि अनुभवी मार्गदर्शन यांची सांगड औंध परिसरात नव्या आशा पेरत आहे.
चौकट:
योगेश फडतरेंची पत्नीला खंबीर साथ
औंध गटाच्या उमेदवार मनीषाताई फडतरे यांना त्यांचे पती योगेशभाऊ फडतरे यांची खंबीर साथ लाभली आहे. युवा उद्योजक म्हणून ओळख असलेल्या योगेशभाऊ फडतरे यांनी राणीसाहेबांच्या नेतृत्वात औंध गटाचा कायापालट घडवण्याची मोहीम हाती घेतली आहे. विकासासाठी निधी, नियोजन आणि निगराणी या तिन्ही पातळ्यांवर त्यांची सक्रिय भूमिका औंध गटाच्या भविष्यासाठी बळकटी देणारी ठरत आहे.
आज औंध गटात प्रचार म्हणजे केवळ घोषणा नाहीत; तो जनतेच्या घरापर्यंत पोहोचलेला विश्वास आहे. तो म्हणजे शांततेत घडणारा परिवर्तनाचा प्रवास आहे. दादांच्या आठवणींनी प्रेरित, राणीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुण नेतृत्वाच्या जोमाने—औंध गटात राष्ट्रवादी काँग्रेसची विकासगाथा नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. ही केवळ निवडणूक नाही; हा औंधच्या भविष्याचा निर्धार आहे.
