प्रतिनिधी / स्वाती हडकर
चिपळूण तालुक्यातील सावर्डे पंचक्रोशीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असताना ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला. सावर्डे कॉलनी मतदारसंघ हा आमदारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र येथे अवघी ३२ मते नोंदविल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदानाचा उत्साह मावळल्याचे चित्र दिसून आले.
कॉलनी पोलीस लाईन सावर्डे, पिंपळ मोहल्ला सावर्डे, कुडप गाव तसेच कोंडमळा येथील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अनेक मतदार मतदान न करताच निराश होऊन घरी परतल्याची माहिती आहे.
सुमारे दोन तासांनंतर मशीन बदलण्यात आल्याने मतदान पुन्हा सुरू झाले. मात्र या प्रकारामुळे मतदार तसेच कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
