चिपळूण / प्रतिनिधी : स्वाती हडकर
कोकणच्या लाल मातीत साहित्याचा नवा इतिहास घडणार असून चिपळूण तालुक्यातील मांडकी–पालवण येथे कोकणातील पहिलेवहिले ‘ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन’ भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन १३, १४ व १५ फेब्रुवारी या कालावधीत मांडकी–पालवण येथील कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर पार पडणार आहे. संमेलनासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत सदानंदजी मोरे हे संमेलनाध्यक्ष असून ते समारोप सत्रात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील विविध दिग्गज राजकीय नेते, साहित्यिक व विचारवंत एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या संमेलनाला मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून साहित्य क्षेत्रातील नामवंतांची मांदियाळीही व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व अखिल भारतीय सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या भरगच्च कार्यक्रमानंतर होणारा समारोप सोहळाही तितकाच दिमाखदार असणार असून समारोपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्रालय पुरस्कृत तसेच डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
ग्रामीण जीवन, शेती, सहकार आणि साहित्य यांचा सुंदर संगम साधणारे हे संमेलन कोकणातील साहित्य चळवळीला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
