प्रतिनिधी :स्वाती हडकर
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटनांमुळे निवडणूक आयोगाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.
खेड तालुक्यातील जामगे येथील मतदान केंद्रावर स्वतःचा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या तयारीवर थेट नाराजी व्यक्त केली. मतदानाच्या दिवशीच ईव्हीएम मशीन बंद पडत असतील, तर हे आयोगाच्या अपुऱ्या नियोजनाचे द्योतक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कदम म्हणाले की, “निवडणूक ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया आहे. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान वारंवार ईव्हीएम मशीन बंद पडत असल्यास मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. याचा थेट परिणाम मतदारांच्या उत्साहावर आणि विश्वासावर होतो.”
ईव्हीएमबाबत जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आयोगाकडून योग्य नियोजन होत नसेल, तर पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात कोणतीही हरकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
“बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ईव्हीएमविषयीचा कायमस्वरूपी संभ्रम दूर होईल आणि मतदारांचा विश्वास अधिक बळकट होईल,” असेही कदम यांनी सांगितले.
ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेला विलंब झाला असून, ही बाब लोकशाहीच्या विश्वासार्हतेसाठी घातक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरळीत असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केले.
