किनवट- शुभम शिंदे
किनवट तालुक्यातील दयाळधनोर परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दत्ता बळीराम जाधव यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून १० लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी वन विभागामार्फत हा धनादेश वारसदारांना सुपूर्द करण्यात आला.
मदत वितरण कार्यक्रम आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत पार पडला. शासन नियमांनुसार देण्यात आलेली ही रक्कम कुटुंबीयांना अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
वन विभागाने नागरिकांनी जंगल परिसरात वावरताना सतर्कता बाळगावी आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन केले. गावकऱ्यांनी कुटुंबाला दिलेल्या तातडीच्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.
