अमरावती(प्रतिनिधी) -संजय सरवटकर
रमाई बिग्रेड संघटना,जीवन विकास फाऊंडेशन तसेच दैनिक वृत्त राजवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने,त्यागमूर्ती माता रमाई जयंती महोत्सवात आंबेडकरी कवी संमेलनाचे आयोजन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) अमरावती येथे करण्यात आले होते.जेष्ठ आंबेडकरी कवी शिवा प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आंबेडकरी कवी संमेलनात शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे यांनी,”माँ का फर्जं निभाने के लिये
रमाई का आँचल बन जावो
वो मकाम हासिल करणे के लिये
बस थोडेसे काबील बन जावो” अशी प्रेरणादायी कविता सादर केली.कवी पद्माकर मांडवधरे यांनी त्यागमूर्ती या कवितेतून रमाईच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकला.विद्रोही अविनाश गोंडाणे यांनी,”शोषण पदोपदी ही घेते नवी व्यवस्था
जाईल प्राण त्याचा घटका भरात आता” या गझलेतून नव्या शोषण व्यवस्थेची चाहूल लागल्याची चिंता व्यक्त केली.
कवी देवानंद पाटील यांनी चळवळ नावाची कविता सादर केली तर कवी श्री. न.डोंगरे,सुशांत मेश्राम,गोवर्धन रामटेके, कवयित्री पद्मा घरडे,आशा मेश्राम यांनी आशयपूर्ण सामाजिक जाणिवांच्या कविता सादर केल्या.कवी संमेलनाध्यक्ष शिवा प्रधान यांच्या अध्यक्षीय रमाई या कवितेने कवी संमेलनाची सांगता झाली. कवी सुशांत मेश्राम यांच्या संचालनाने कवी संमेलनाला रंगत आली. आभार कवयित्री तथा गायिका आशा मेश्राम यांनी मानले.यावेळी आयोजक राजेंद्र उर्फ राजासाहेब वाटाणे यांच्या हस्ते सहभागी कवीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला परिवर्तनवादी , बुद्धिजीवी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
