बद्रीनारायण घुगे
:
जगद्गुरू संत परंपरेचा जागतिक सन्मान करणारा ऐतिहासिक क्षण आज देहू नगरीत अनुभवायला मिळाला. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची जर्मनीतील विठ्ठल धाम येथे उभारण्यात आलेल्या भगवान विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापना होणार असून, त्या मूर्तीचे देहू देवस्थान संस्थानच्या वतीने विधिवत पूजन करून भावपूर्ण वातावरणात हस्तांतरण करण्यात आले.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता टाळ-मृदुंगाच्या गजरात, “ज्ञानेश्वर माऊली तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल” या नामघोषात हा सोहळा पार पडला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. उपस्थित वारकरी, भाविक आणि विश्वस्तांच्या डोळ्यांत भक्तीचे अश्रू तर ओठांवर विठ्ठलनामाचा जयघोष होता.
हा सोहळा केवळ संस्थानपुरता मर्यादित नसून, प्रत्येक मराठी मनाचा आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा अभिमानाचा क्षण ठरला. आपल्या लाडक्या तुकोबांची मूर्ती जर्मनीच्या भूमीवर जाणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह आणि समाधानाची भावना व्यक्त होत होती.
माघ वद्य एकादशी या अत्यंत मंगल दिवशी हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. श्री संत तुकाराम महाराज संस्थान चे अध्यक्ष, सर्व विश्वस्त तसेच समस्त वारकरी भाविकांच्या साक्षीने मूर्तीचे विधिवत मंगेश पाटील यांच्या हस्ते , देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे ,नगराध्यक्षा पूजा दिवटे , देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष ,जालिंदर महाराज मोरे , विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे , विक्रमसिंह महाराज मोरे ,उमेश महाराज मोरे , गणेश महाराज मोरे ,संजय बाप्पू बालवडकर , पी.आर .पाटील ,( पंढरपूर ) ,माजी विश्वस्त नितीन महाराज मोरे व वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थित पूजा व आरती करण्यात आली. ही संत तुकाराम महाराजांची मूर्ती संजय आंबेकर ( औन्ध ) हे जर्मनीला घेऊन जाणार आहेत. *चिखली येथील मूर्तिकार सतीश हिंगे यांनी ही दोन फूट उंचीची आकर्षक मूर्ती काळ्या पाषाणा पासून घडवली, असून जर्मनी येथील ख्रिर्षहाईम येथील विठ्ठलधाम मंदिरात अक्षय तृतीया १९ एप्रिल २०२६ रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.या साठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे , माजी विश्वस्त नितीन महाराज मोरे ,सुनील महाराज मोरे ,सूर्यकांत मोरे , तसेच सुरेश काळोखे त्यांची पत्नी सुरेखा काळोखे सुनील झेंडे ,त्यांची पत्नी मीना झेंडे ,श्रीकांत पाटील , संजय बालवडकर , रथाचे मानकरी सतीश सोलंकी ,आदीसह चाळीस भाविक भक्त जर्मनीला जाणार आहेत.*
देहूतून जर्मनीपर्यंत विठ्ठलनामाचा गजर पोहोचणार असून, संत परंपरेचा संदेश आता सातासमुद्रापारही घुमणार आहे. वारकरी संप्रदायासाठी हा क्षण अभिमानाचा आणि इतिहासात नोंदवला जाणारा ठरला आहे.


