ट्रम्प यांचे सूर पुन्हा बदलले; इराणसमोर आखली ‘रेड लाईन’, युद्ध अटळ?
वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्धविरामाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
इराणने सादर केलेला १० कलमी प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. व्हाईट हाऊसने इराणच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे दोन आठवड्यांचा युद्धविराम धोक्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉनवरही हल्ले सुरुच आहे. यामुळे तणाव वाढला असून इराणने हल्ले थांबले नाही तर युद्धविराम कारारतून बाहेर पडू असा इशारा दिला होता. यामुळे पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.
अमेरिकेची आक्रमक भूमिका
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे की, इराणचा १० कलमी प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला असून तो कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला आहे. हा प्रस्ताव एकतर्फी आणि गंभीर्यपूर्ण नव्हता आणि ट्रम्प यांना तो वाटाघाटीसाठी पात्र वाटला नाही. यामुळे आता प्रस्तावाची एक नवी सुधारित योजना सादर करण्यात आली आहे. तसेच ट्रम्प यांच्या १५ कलमी प्रस्तावाशी जोडून आता वाटाघाटींची चर्चा होणार असल्याचे सेक्रटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी इराणसमोर रेड लाइन आखली आहे. इराणने युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवावे अशी अट ट्रम्प यांनी घातली आहे.
लेबनॉनवर हल्ले सुरुच
दुसरीकडे इस्रायलकडून युद्धबंदीच्या घोषणेनंतरही लेबनॉनवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे इराणने संताप व्यक्त केला असून हल्ले थांबले नाहीत, युद्धविराम करारातून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील अमेरिका इराण तणाव पुन्हा एकदा भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. इस्लामाबाद मध्ये १० एप्रिल रोजी होणाऱ्या चर्चेपूर्वीच ट्रम्प यांनी आपले सूर बदलल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
