नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली.
शिर्डी पोलिसांकडून काल प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय. स्वत: प्रतिभांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या खात्यांवरुन 2 कोटींच्यावर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवण्यात आला. सख्ख्या बहिणी असणाऱ्या रुपाली आणि प्रतिभा या सख्ख्या जावादेखील आहेत.
माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा चाकणकर यांनी दिली. प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीनंतर आता ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत विविध सवाल उपस्थित केले आहेत. आम्ही एसआयटीला भेटायला गेलो होतो एसआयटी या मुख्य इमारतीपासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पसमध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डीमध्ये हे प्रिवीलेज का मिळाले? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारेंचे 6 धडधडीत प्रश्न-
पुढे सुषमा अंधारेंनी 6 महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. यामध्ये 1. जर अंजली दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच म्हणणं आहे. तर अजूनपर्यंत दमानियांना अटक का केली नाही? 2. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी?
3. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ? 4. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियांनी सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकरांमध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही? 5. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ? 6. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एसआयटीला ? दमानिया महाराष्ट्राला? SIT पीडित महिलांना?…कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे…, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
