नाशिक : भोंदू अशोक खरात यांच्याविरोधातील प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असून आता आणखी एका मोठ्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा त्यांच्या नावावर नोंदवण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यातील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर तब्बल ३२ बनावट खाती उघडून सुमारे ५७ लाख ९० हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या संचालक मंडळासह खरात याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट खात्यांचा मोठा घोटाळा उघड
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या नावाचा गैरवापर करून अनेक खाती उघडण्यात आली आणि त्या खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांमधून जवळपास ५८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संबंधित पतसंस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
संचालक मंडळावरही कारवाई
या प्रकरणात केवळ अशोक खरात याच्यावरच नव्हे, तर पतसंस्थेच्या संचालक मंडळावरही जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. पोलिसांनी संचालक मंडळातील सदस्यांविरोधातही गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधितांनी निष्काळजीपणा केला की जाणीवपूर्वक सहभाग होता, याचा तपास केला जात आहे. ईडीच्या कारवाईची शक्यता वाढली
ईडीची कारवाई
दुसरीकडे आर्थिक गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ईडी कडूनही कारवाईला वेग आल्याची माहिती समोर येत आहे. खरात यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती (अटॅचमेंट) येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीकडून संबंधित संपत्तीची तपशीलवार छाननी केली जात असून, संशयित व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे.
छापे आणि कागदपत्रांची जप्ती
तपास यंत्रणांकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. बँक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, काही संशयास्पद बँक खाती सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगसंदर्भातही तपास सुरू आहे.
कायद्याचा फास आवळणार?
नवीन गुन्हे दाखल होणे, ईडीच्या चौकशीची शक्यता आणि सतत उघड होत असलेले गैरव्यवहार यामुळे अशोक खरात यांच्यावर कायद्याचा फास अधिकच आवळत चालला आहे. येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
