एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर असतानाच धडकले बदलीचे आदेश…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. २०) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान भारतीय पोलीस सेवेतील ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये सातारचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचेही बदली आदेश आहेत.
दोशी यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. पुण्याचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे हे सातारचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत.
सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदानाला आले असताना सभागृहाच्या बाहेर अटक केली हेाती. त्यावेळी झालेल्या राड्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते.
मंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी विधान परिषद आणि विधानसभेत आवाज उठविण्यात आला होता. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे सांगून अधीक्षक दोशींसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यावेळी सभागृहात देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली गेली होती. विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे निर्देश सरकारला दिले होते.
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांचे निलंबन टळले होते. पण हा वाद सुरू असतानाच तुषार दोशी रजेवर गेले होते. त्यावेळी ही सक्तीची रजा आहे, की अर्जित रजा यावर चर्चा रंगली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यात यावरून कलगीतुराही रंगला होता. पण अखेर दोशी यांची बदली झाली आहे.
यापूर्वी तुषार दोशी यांची जालना जिल्ह्यातूनही वादामुळेच बदली करण्यात आली होती. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाठीचार्ज करत मारहाण केल्याचा त्यांचावर आरोप झाला होता. यावेळी गोळीबार झाल्याचाही दावा जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तिथून त्यांची पुण्याला बदली झाली होती. पुण्यातून सातारा आणि तिथून सांगलीला बदली झाली आहे.
