मोदीबागेत कौटुंबिक डिनरमागील राजकीय खेळीची चर्चा…
पुणे : पुण्यातील मोदीबाग येथे मंगळवारी झालेल्या एका स्नेहभोजनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या स्नेहभोजनात पवार कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य एकत्र आल्याने, याला ‘कौटुंबिक भेटी’पेक्षा ‘राजकीय खेळी’च्या दृष्टीने पाहिले जात आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा सदस्य पार्थ पवार, आमदार रोहित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबातील तरुण पिढी उपस्थित होती. गेल्या काही वर्षांत राजकीय मतभेद, पक्षात पडलेली फूट आणि जाहीर आरोप-प्रत्यारोपांनंतर हे कुटुंब पुन्हा एकाच छताखाली आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
राजकीय फेरजुळणी?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. कुटुंबातील तरुण नेतृत्वाला एकत्र बसवून शरद पवार यांनी काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत का, अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत समन्वय साधणे आणि निवडणुकीच्या तोंडावर ‘पवार ब्रँड’ची एकजूट दाखवणे, हा या ‘डिनर डिप्लोमसी’चा मुख्य उद्देश असावा, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवी उत्सुकता
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. प्रकृती सुधारताच त्यांनी कुटुंबातील सदस्यांना एकत्र बोलावणे हे त्यांच्या पुढील राजकीय हालचालींची नांदी मानली जात आहे. अधिकृतरीत्या हे स्नेहभोजन ‘कौटुंबिक’ असले, तरी राजकारणात काहीही योगायोग नसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमधील वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी या बैठकीत कोणत्या धोरणांवर शिक्कामोर्तब झाले, हे आगामी काळात स्पष्ट होईलच, मात्र या ‘मोदीबाग डिनर’ने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी उत्सुकता नक्कीच निर्माण केली आहे.
‘सीआयडी गांभीर्याने घेत नाही’
दुसरीकडे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘सरकार आणि तपास यंत्रणा हे प्रकरण अपेक्षित गांभीर्याने हाताळत नाहीत,’ असा आरोप त्यांनी केला.
अजित पवार विमान अपघात प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. या अनुषंगाने तपासाचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार ‘सीआयडी’ कार्यालयात आले होते. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, ‘मी तिसऱ्यांदा सीआयडी कार्यालयात आलो, तरी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे खुर्चीचे छायाचित्र काढावे लागले. दरम्यान, अजित पवार यांच्या अपघातापूर्वी काटेवाडीत निवासस्थानाजवळ आणि मुंबईतील देवगिरी बंगला भागात अघोरी पूजा करण्यात आल्याची माहिती आहे, असा दावाही आमदार पवार यांनी केला.
