राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निधनाला आज ४ महिने पूर्ण झाले. अपघाताच्या वेळी ज्या व्हीएसआर (VSR) कंपनीच्या विमानामधून अजितदादांनी प्रवास केला होता, आता त्याच विमानातून पार्थ पवार यांनी प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं होतं.
पण, अखेरीस या वादावरून पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते विमान VSR कंपनीचं होतं, हे मला माहित नव्हतं, कर्मचाऱ्यांकडून चूक झाली’ असं स्पष्टीकरण पार्थ पवारांनी दिलं.
पार्थ पवार यांनी ट्वीट करून VSR विमानाच्या प्रवासावर आपली भूमिका मांडली आहे. “पुण्यात मोदी बाग इथं पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचं असल्यानं मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितलं होतं. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आलं. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती’ असं पार्थ पवारांनी सांगितलं.
VSR कंपनीसोबत करार रद्द
तसंच, ‘ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसंच माझ्या कर्मचारी वर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असं पार्थ पवारांनी सांगितलं.
“VSR Aviation बाबत बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे, आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, अशी नाराजीही पार्थ पवारांनी व्यक्त केली.
