
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर येथील भिसी चालक आरोपींना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी इंदापूर पोलिस ठाण्यासमोर रविवारी दि.०१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून इंदापूर शिवसेना शहर प्रमुख व भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य महादेव सोमवंशी व भिसी फसवणूकीतील तक्रारदार यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. यामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे ही सहभागी झाले होते.
इंदापूर शहरातील झालेल्या करोडो रुपयांच्या भिसी फसवणुकी संदर्भात दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेस ३ महिने ओलांडले असता अद्याप या प्रकारणातील १७ आरोपी पैकी मुख्य १४ आरोपी फरार आहेत. त्यांना तात्काळ अटक करावी अशी आंदोलकांची मागणी आहे.
सदर आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असुन त्यांच्या पासुन फसवणूक झालेल्या सामान्य तक्रारदारांच्या जिवीतास धोका होवू शकतो. म्हणून तक्रारदारांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे. तरी संबधीत प्रशासनाने या प्रकरणी त्वरीत आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचं आंदोलकांनी सांगितले होते.
या प्रयत्नांना यश नाही आले तर, दि.३/५/२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता सर्व भिसी सदस्य आपल्या संपूर्ण कुटुंबासह इंदापूर पोलिस स्टेशन कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करणार होते, आणि जोपर्यंत पुढील कारवाई होत नाही तोपर्यंत हा अन्यायासाठी चा लढा असाच चालू ठेवणार होते, तरीदेखील न्याय नाही मिळाला तर दिनांक ४/५/२०२२ रोजी पासून इंदापूर बंद ठेवून मोर्चा काढण्यात येणार होता.
दरम्यान गुन्हेगारांना कायदेशीर अटक केली जाईल,पोलीस विभागाची कारवाई सुरू आहे.आपण सुरु केलेले हे आमरण उपोषण तूर्तास मागे घ्यावे अशी विनंती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी केली.यावेळी सहा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे देखील उपस्थित होते.मात्र आंदोलकांमध्ये प्रचंड संतापाची लाट असल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते .
परंतु आज इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब यांनी सदर भिशी गुन्ह्यातील फरारी आरोपींची अटकेची कारवाई इंदापूर पोलिस ठाणे येत्या 14 दिवसात पूर्ण करत आहे, असे लेखी दिल्यानंतर प्रमुख उपोषण करते इंदापूर शहर शिवसेना प्रमुख मेजर महादेव सोमवंशी आणि फसवणूक झालेले सर्व भिसी सदस्य यांनी आपले आमरण उपोषण सोडले.