
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा:-
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा चीन , रशिया आणि ब्रिटनमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केल्याचं पहायला मिळतंय.
चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊनही जाहीर करण्यात आलाय. तर, तिकडे ब्रिटन आणि रशियात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं शिरकाव केल्यामुळं चिंता वाढवलीय. त्यातच आता WHO चा रिपोर्टही समोर आलाय.
सन 2020-2021 मध्ये कोविड-19 साथीच्या रोगामुळं 13.3 ते 16.6 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे, असं WHO ने जाहीर केलेल्या अहवालात नमूद केलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन अंदाजानुसार, 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान कोविड-19 साथीच्या आजाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित मृत्यूंची संख्या अंदाजे 14.9 कोटी (श्रेणी 13.3 कोटी ते 16.6 कोटी) होती, असं यूएन आरोग्य एजन्सीनं एका निवेदनात म्हटलंय. शिवाय, भारतात सर्वाधिक कोरोनाचे बळी गेल्याचं स्पष्ट केलंय.
WHO च्या अंदाजानुसार, कोरोना महामारीमुळं जगात आतापर्यंत सुमारे 15 दीड कोटी लोकांचा मृत्यू झालाय. दोन वर्षांत कोविडमुळं झालेल्या मृत्यूंपेक्षा हा आकडा 13 टक्के अधिक आहे. डब्ल्यूएचओचा असा विश्वास आहे की, अनेक देशांनी कोविडमुळं झालेल्या मृतांच्या संख्येला कमी लेखलंय. संघटनेच्या म्हणण्यानुसार, केवळ 54 लाख मृत्यू अधिकृत झाले आहेत.
WHO नं भारतात नोंदवलेल्या मृत्यूंची संख्या जगभरातील मृत्यूच्या एक तृतीयांश आहे. पण, भारत सरकारनं WHO च्या मूल्यांकनाच्या पद्धतींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वापरलेल्या मॉडेलच्या वैधतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. या प्रक्रियेवर, पद्धतीवर आणि परिणामांवर भारताचा आक्षेप असूनही WHO ने अतिरिक्त मृत्यू दराचा अंदाज जारी केलाय, असं भारत सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.
भारताच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळं मरण पावलेल्या लोकांची संख्या 5,23,975 आहे. भारतात दररोज सुमारे तीन हजार संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. डेल्टा वेरिएंटमुळं मोठ्या संख्येने लोक मरण पावले, तेव्हा भारतातील बहुतेक मृत्यू दुसऱ्या लाटेदरम्यान झालेत, असं म्हटलंय. मात्र WHO म्हणते की, 54 लाख मृत्यूची नोंद झालीय. शिवाय, मृत्यू झालेल्या 95 लाख लोकांपैकी बहुतेकांच्या मृत्यूचं कारण कोविड मानलं गेलंय, असं अहवालात नमूद केलंय.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले, ‘हा चिंताजनक डेटा केवळ साथीच्या रोगाच्या प्रभावाकडं निर्देश करत नाही, तर सर्व देशांनी मजबूत आरोग्य माहिती प्रणालीसह संकटकाळात आरोग्य प्रणालींमध्ये गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे संकेत देत आहे. सध्या हे धक्कादायक चित्र असलं, तरी आपल्याला यातून मार्ग काढणं तितकंच महत्वाचं आहे.’