
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वच राजकीय पक्ष पुनश्च: हरिओमचा नारा देत पालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज आहेत; तरी सत्ता सोपान चढण्यासाठी मागील निवडणुकीत विक्रमी जागा मिळवित सत्तेवर असलेल्या भाजपला तगडा सामना द्यावा लागणार आहे. त्यामुळे पुण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच राष्ट्रवादी-शिवसेना आणि कॉंग्रेसला आघाडीत लढण्यास अनुकूल असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर, महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपची विकासाची कामे आणि मराठीचा नारा मागे ठेवत हिंदूत्वाचा झेंडा खाद्यांवर घेऊन नव्या प्रवासाला निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्मानण सेनेसोबत युती होण्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. भाजप आणि मनसेचा राजकीय शत्रू म.वि.आ. असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याने हे दोन्ही पक्ष पुण्यात महापालिकेत एकत्र येतील, असा होरा आहे. तर, पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळविणारा आपचा “झाडू’ पुण्यातही धुराळा उडवणार आहे. त्यामुळे पुण्यात परिस्थिती नुसार कोणाशीही युती – आघाडी होवू शकते हे सूज्ञ पुणेकर जाणून आहे.