
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश नामदेव माने
जालना जिल्ह्यात मराठा आणि वंजारी समाजांत तुफान दगडफेक ! पोलिसांचा हवेत गोळीबार, 19 जण जखमी !!
चांदई एक्को येथे प्रवेश द्वाराला नाव देण्यावरून राडा
चांदई एक्को जालना दगडफेक
जालना, दि. 12- प्रवेशव्दाराला नाव देण्यावरून मराठा व वंजारी या दोन समाजामध्ये वाद होवून तुफान दगडफेक करण्यात आली. जमावाला शांततेचे आवाहन करूनही तो ऐकत नसल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. दरम्यान दगडफेकीत अग्निशमन दलाचे 3 जवान, 6 पोलिस व 10 ग्रामस्थ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना चांदई एक्को (ता. भोकरदन, जि. जालना) येथे आज दुपारी घडली.
जालना जिल्ह्यातील चांदई गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता. हा पुतळा हटवण्यासाठी गावात पोलिसांचे पथक जेसीबी घेवून आले. दरम्यान एका गटाकडून वेशीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होती तर दुसर्या गटाकडून सदरील प्रवेशव्दाराला गोपीनाथ मुंढे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होती. या दोन मागण्यांवरून वाद सुरु झाला. नंतर वाद वाढत गेला व त्याचे रुपांतर दगडफेकीत झाले.
पोलिसांनी दोन्ही गटांना शाततेचे आवाहन केले. मात्र, दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दगडफेकीत बंदोबस्तावरील 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले. अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झाले. याशिवाय 10 ते 12 ग्रामस्थ जखमी झाले. जमावाच्या दगडफेकीत पोलिस व्हॅन,अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या काचा फुटल्या.
बंदोबस्तावरील पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्यामुळे व दोन गटांत सुरु असलेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यातील एक गोळी एका जणाच्या हाताला चाटून गेली. जखमी ग्रामस्थांना जालन्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तातडीने दखल घेऊन पोलिसांना योग्य ते निर्देश दिले. पोलीस प्रशासन योग्य कारवाई करत असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीसांचा, SRPF चा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.