
दैनिक चालु वार्ता भोर प्रतिनिधी जीवन सोनवणे
- भोर, ता. 16 : भोर व वेल्हे तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले त्वरित देण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने मंगळवारी (ता. १७) पासून महिनाअखेरपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन केल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. भोर व वेल्हे हे दोन्ही तालुके अतीपर्जन्य क्षेत्रात मोडणारे असून त्यातील बराच भाग दुर्गम आहे. या तालुक्यांमध्ये दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसास सुरवात होते. मागील वर्षी कोविड-१९ परिस्थितीमुळे शैक्षणिक प्रवेश लांबणीवर पडलेले आहेत. त्यामुळे या वर्षासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्न, जातीचा, नॉन क्रिमीलेअर, अधिवास दाखले पावसाळा सुरु होण्यापूर्वीच सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. १७ ते ३१ मे या कालावधीमध्ये दाखल्यांच्या प्रस्तावावर निर्णय घेऊन तत्काळ वितरण केले जाणार आहे. त्यासाठी महसूल विभागाचे सर्व तलाठी, मंडल अधिकारी, सेतू चालक व महा ई सेवा केंद्र चालकांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. जातीचे व नॉनक्रीमीलेअर सारखे प्रांताधिकारी कार्यालयाकडून दिले जाणारे दाखले वगळता सर्व दाखले दुसऱ्या दिवशी दिले जाणार आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थी किंवा पालकांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास त्याही दुसऱ्या दिवशी सांगण्यात येणार आहेत. तरी भोर-वेल्हे तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी याच महिन्यातील विशेष मोहिमेत दाखले काढून घ्यावेत आणि पुढील शिक्षणाची गैरसोय टाळावी असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, भोरचे तहसीलदार सचिन पाटील व वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी केले आहे.