
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबाद शहरात भाजपच्या वतीने २३ मे रोजी सायंकाळी चार वाजता हंडामोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेनेला पाण्यावरून घेरण्याच्या व्यूहरचनेचा भाग म्हणून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.
भाजपने मंजूर केलेली योजना रद्द केल्यानंतर नव्याने आणलेल्या योजनेमुळे महापालिकेला ४०० कोटी रुपये नव्याने भरावे लागणार आहेत. ती रक्कम कोठून मिळणार, वाढत्या पोलादाच्या किमतीमुळे योजनेचे काम तीन महिन्यापासून बंद आहे. कंत्राटदार दिलेल्या कालमर्यादेच्या खूप पाठीमागे आहे. सध्या सुरू असलेल्या पाणी योजनेचे प्राधान्यक्रमच चुकलेले आहेत. परिणामी २५ कोरडया पाण्याच्या टाक्या चुकलेल्या नियोजनाचा परिपाक आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.
मागील अनेक वर्षे महापालिकेमध्ये एकत्रित काम करणाऱ्या भाजपने आता शिवसेना विरोधातील आघाडी अधिक तीव्र केली असल्याचे संदेश पाणी मोर्चातून दिले जाणार आहेत. गेली अनेक वर्षे भाजप हा महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे सारे निर्णय हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना विचारुनच घ्यावे लागत. त्यामुळे महापालिकेत भाजपला स्वतंत्रपणे काम करता आले नाही. त्यामुळे पाणी योजनेतील सर्व चुकीचे निर्णय हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे होते, असा आरोपही पत्रकार बैठकीत करण्यात आला. प्रशासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे आवर्जून सांगण्यात आले.