
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानाहून सव्वा दहा वाजता पुण्याकडे रवाना झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात वसंत मोरे तसेच काही पदाधिकारी व नेत्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. त्यात राज ठाकरे यांचा दोन दिवसीय दौरा होतोय, यामध्ये पुण्यातील नाराज नेते व पदाधिकारी यांची धुसफूस शांत होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
पुण्यातील दोन दिवसीय दौऱ्यात ठाकरे काय करणार?
5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा, पुणे सभा तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुका यासंदर्भात पुण्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडण्याची शक्यता या दौऱ्या निमित्ताने आहे. तसेच पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नाराजी संदर्भात पदाधिकारी व नेत्यांची भेट देखील राज ठाकरे घेण्याची शक्यता आहे.
पुण्यातील सभेकडे लक्ष…
राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी परवानगीसाठी अर्ज करण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेचे नियोजन यासंदर्भात देखील चर्चा पुणे दौरा राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर करणार असल्याचे म्हटले जात आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मागितली आहे मात्र अद्याप यावर पोलिसांनी माहिती कळवली नाही. या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सभा होणार असल्याचं म्हटलं जातंय मात्र अद्याप परवानगी आणि नियोजन नाही त्यामुळेमनसेची सभा होणार की नाही याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.
दोन दिवसीय दौऱ्यात अनेक घडामोडी
राज ठाकरेंच्या पुण्यातील दोन दिवसीय दौऱ्यात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. पुण्यात मनसेची पक्षसंघटना मजबूत आहे. मात्र गेल्या महिन्यात भोंग्याच्या भूमिकेबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढल्यानंतर पुण्यामध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळतेय. त्यावर या दौऱ्यामध्ये पडदा पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील निवडणुका यासंदर्भात देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाटप होण्याची शक्यता आहे. तसेच यानिमित्ताने महत्त्वाची पत्रकार परिषद देखील पार पडण्याची शक्यता आहे.