
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कोथरुडकरांसाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार
पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना सहकार कायद्यासह आपल्या घराचे प्रॉपर्टी कार्ड तयार करुन घेणे किंवा मालकीच्या घरांसंदर्भातील इतर कागदपत्रांतील त्रुटी यांमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, आपल्या मतदारसंघातील सोसायटी आणि अपार्टमेंट भागातील नागरिकांसाठी प्रॉपर्टीकार्डसह घराच्या कागदपत्रांसदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी दिनांक २२ मे २०२२ रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन गृहनिर्माण सोसायट्यांसह जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे प्रमाण देखील दिवसागणिक वाढत आहे. त्यासोबतच रहिवाशांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करुन घेणे, सहकार कायदा व डिम्ड कन्व्हेयन्स, सोसायटींचा पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास यांमध्ये बदलत्या काळानुसार कायद्यातील सुधारणांमुळे नागरिकांना ज्या समस्यांचा समाना करावा लागत आहे.
त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्याच्यादृष्टीने आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिनांक २२ मे २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत बाल शिक्षण मंदिर येथे कोथरुडकरांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रसिद्ध वास्तूविशारद चंद्रशेखर प्रभू मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमास पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन हे अवर्जून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत उपस्थितांपैकी काही नागरिकांच्या प्रश्नांना तज्ज्ञ व्यक्ती उत्तरे देणार आहेत.
तरी कोथरुड मतदारसंघातील सोसायटी भागातील रहिवासी आणि अपार्टमेंटधारकांनी याचा लाभ घेऊन, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.