
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
मनरेगा’ व इतर योजनांच्या माध्यमातून उपक्रम – उपजिल्हाधिकारी राम लंके
अमरावती :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठरवून दिले असून, ‘मनरेगा’ व इतर योजनांच्या माध्यमातून ही कामे आकारास येणार आहेत असे रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सांगितले.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे,प्रवीण सिनारे,जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दि.वि.निपाणे,भूजल सर्वेक्षण वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी,कार्यकारी अभियंता विकास वऱ्हाडे,जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.जी.जाधव आदी उपस्थित होते.
‘बीडीओ’ नोडल अधिकारी असतील
या उपक्रमासाठी तालुका स्तरावर गटविकास अधिकारी हे नोडल अधिकारी असतील.याबाबतचा आदेश व सूचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.अस्तित्वात असलेल्या तलाव,जलाशयांचे पुनरूज्जीवन करण्याबरोबरच नवीन जलाशयांची निर्मिती या उपक्रमाद्वारे होणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,१५ वा वित्त आयोग,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदींच्या संयोजनातून १५ ऑगस्टपूर्वी किमान ७५ सरोवरे साकारण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती श्री.लंके यांनी दिली.
याबाबत सर्व संबंधित विभागांनी अमृत सरोवराबाबतची कामे प्रकल्पकृती आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना सादर करावे.गावाची निवड करतांना स्वातंत्र्यचळवळ,शहिद हुतात्मे,स्वातंत्र्यसैनिकांच्या गावाची निवड प्राधान्याने करावी.या सर्व प्रक्रियेत व्यापक लोकसहभाग मिळवावा.अमृत सरोवराचे भूमिपूजन स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते करावे.हे काम गती घेण्याच्या दृष्टीने २२ मे पूर्वी प्रस्तावित कामाची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.