
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
समितीची तांड्या वस्त्यांना भेट; आश्रमशाळा-वसतिगृहांची तपासणी
अमरावती :-भराडी,बंजारा व विविध विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजबांधवांना जातीचे दाखले मिळण्यासाठी शिबिरे घ्यावीत व त्यांना तत्काळ जात दाखले मिळवून द्यावेत असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने दिले.
महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा जिल्ह्यात दौरा सुरू असून आज समितीने शेंदोळा,मोझरी येथील शाळा-वसतिगृहांच्या तपासणीबरोबरच माळेगाव व दिवाणखेड येथील तांड्या वस्त्यांना भेट दिली.समितीप्रमुख आमदार शांताराम मोरे,आमदार बळवंतराव वानखडे,अवर सचिव मंगेश पिसाळ,विनोद राठोड,उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर,तहसीलदार वैभव फरतारे,गटविकास अधिकारी चेतन जाधव,समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे,सहायक आयुक्त माया केदार आदी उपस्थित होते.
समितीतर्फे सर्वप्रथम शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.जिल्हाधिकारी पवनीत कौर,मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा,महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल,उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
त्यानंतर समिती सदस्यांनी शेंदोळा येथील वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक तसेच माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन हजेरीपट व इतर दस्तऐवज,विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था,भोजन व्यवस्था,स्वच्छतागृह आदी प्रत्येक बाबीची तपासणी केली.मोझरी येथील आयटीआय येथेही तपासणी करण्यात आली.समिती सदस्य व मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले व गुरुकुंज आश्रमालाही भेट दिली.आश्रमातर्फे ग्रामगीता देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
तांडा वस्त्यांना भेट
समितीने माळेगाव व दिवाणखेड येथील तांडा वस्त्यांना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला व नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.अनेक नागरिकांना जातीचे दाखले मिळालेले नाहीत.याबाबत प्रशासनाने लक्ष घालून मोहिम स्तरावर व स्वतंत्र शिबिरे घेऊन नागरिकांना दाखले मिळवून द्यावेत.कुणीही पात्र व्यक्ती दाखला मिळण्यापासून वंचित राहू नये असे निर्देश समितीने दिले.विजाभज समाजबांधवांना घरकुले व इतर लाभ मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.या योजनेत वस्तीच्या समावेशासाठी आवश्यक प्रस्ताव पाठवावेत असे निर्देशही समितीने दिले.
यापुढील कार्यक्रम
समितीचे सदस्य दि.१९ मे रोजी सकाळी १० ते २ दरम्यान विविध स्थळांना भेट देतील यादिवशी दुपारी ३ वाजता समितीकडून नियोजनभवन येथे पोलीस अधिक्षक कार्यालय,महापालिका,नगरपालिका,नगरपंचायती,परिवहन,एमआयडीसी,उद्योग विभाग,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ,सार्वजनिक बांधकाम विभाग आदी कार्यालयांच्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी व कर्मचारी भरती,बढती,आरक्षण व अनुशेष तसेच विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात येईल.
समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवार दि.२० मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जात पडताळणी समिती,जिल्हा परिषद कार्यालय,समाजकल्याण आदी कार्यालयांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची भरती,बढती,आरक्षण व अनुशेष आदींबाबत,तसेच कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात येईल.त्यानंतर याचदिवशी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीने केलेल्या पाहणीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होईल.