
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी केलेल्या प्रभाग पुनर्रचनेवर आधी भाजपने आक्षेप घेतला होता. मात्र, आता सत्तेत सहभागी असलेल्या कॉंग्रेसनेही नाराजी व्यक्त केली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सोयीनुसार प्रभाग पुनर्रचना झाली असल्याचा आरोप केला आहे.
नाना पटोले म्हणाले, तीन पक्षांचे सरकार असताना सर्व पक्षांनी मिळून प्रभाग रचना करायला हवी. आपण सोबत राहून जर आपल्या मित्रपक्षाचे नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही. त्यामुळे आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आम्ही पुण्यासह अनेक ठिकाणी न्यायालयात गेलो आहोत. कारण ज्या पद्धतीने प्रभाग रचना झाली, ती चुकीची आहे. आमची मागणी दोनचा प्रभाग करण्याची होती, पण तीन सदस्यांचा प्रभाग करण्यात आला आहे.
मुंबई, पुण्यात महाविकास आघाडीतील काही पक्ष आपल्या सोयीने प्रभाग तयार केले आहेत. याबाबत आम्ही न्यायालयात न्याय मागण्याची भूमिका घेणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यसभेच्या जागांसदर्भात अद्याप कुठलीही बैठक झालेली नाही. यासंदर्भात लवकरच बैठक होईल. तोवर त्या विषयावर बोलणे अयोग्य ठरेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी प्रभाग पुनर्रचनेवरून महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्ष नाराज असल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस पक्षाकडून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.