दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
निविदेस मंजुरी देतांना कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणुक होणार नाही याची खबरदारी घ्यावी – खासदार इम्तियाज जलील
महानगरपालिकेच्या विविध विभाग व अधिनस्त वार्ड कार्यालयात कुशल व अकुशल कंत्राटी तत्वावर मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी विविध कंत्राटदाराकडून आलेल्या निविदेस मंजुरी देतांना कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणुक होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना विविध कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन व भत्ते, विशेष / महगाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), राज्य कामगार विमा योजना (इसीआयएस), कर्मचारी नुकसान भरपाई (डब्ल्युसी), व्यावसायिक कर (पीटी), बोनस व सुट्यांच्या दिवशी केलेले कामाचा मोबदला वेळेवर देण्याचे आदेश नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटदाराला देण्याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी मनपा प्रशासक, कामगार उपायुक्त, आयुक्त भविष्य निर्वाह निधी व आयुक्त कर्मचारी राज्य विमा विभाग यांना पत्राव्दारे कळविले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केले की, महानगरपालिकेच्या विविध विभागात सद्यस्थितीत कार्यरत अनेक कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा प्रत्यक्ष भेटून वेळेवर मासिक वेतन न मिळणे, शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन न देता कंत्राटदाराच्या मर्जीप्रमाणे वेतन देणे, पी.एफ व ई.एस.आय.सी चा लाभ न देणे, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाना शासनाच्या नियमाप्रमाणे विविध आरोग्य संबंधी योजना व इतर महत्वपूर्ण योजनांचा लाभ न देणे अशा विविध प्रकारच्या अनेक गंभीरस्वरुपाच्या तक्रारी केलेल्या आहेत.
विशेष म्हणजे कामगारावर होणाऱ्या अन्यायाबाबत अनेक कामगार संघटनांनी लोकशाही मार्गाने विविध आंदोलने केली, संबंधित सर्व विभागात पत्रव्यवहार केले तरी सुध्दा कामगारांना आजपर्यंत न्याय मिळाला नसल्याचे निदर्शनास आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या ज्या विभागात कंत्राटदारांमार्फत कंत्राटी कर्मचारी घेण्यात येणार आहेत अशा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाच्या दिवसांनुसार महिन्याकाठी कंत्राटदाराने संबंधित कर्मचाऱ्यांचे करारानुसार किमान वेतन व भत्ते, विशेष / महगाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), राज्य कामगार विमा योजना (इसीआयएस), कर्मचारी नुकसान भरपाई (डब्ल्युसी), व्यावसायिक कर (पीटी), बोनस व सुट्यांच्या दिवशी केलेले काम इ. अनुज्ञेयतेनुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे सुचना खासदार इम्तियाज जलील यांनी केल्या.
विविध कामगार कायद्याची अमलबजावणी केल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांना भविष्यकाळात कामगार असण्याचे सर्व भत्ते आणि सोयी सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
कंत्राटदारांवर होणार कायदेशिर कारवाई – खासदार इम्तियाज जलील
नवनियुक्त कंत्राटदाराने निविदेत नमुद केल्याप्रमाणे प्रचलित विविध कामगार कायद्याची अमलबाजवणी न केल्यास आणि मनपा सोबत झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदाराविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करुन कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
