
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: महाराष्ट्राचे अराध्यदैवत छ. शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले, जिजाऊंनी बाल शिवाजींना स्वराज्याचे धडे शिकविले अशा ऐतिहासिक व पवित्र लाल महालामध्ये लावणी नृत्य सादर करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीत शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी नृत्यांगना वैष्णवी पाटीलसह चौघां विरूद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीभत्स लावणी सादर करणाऱ्या सर्वांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.
ऐतिहासिक लाल महालात लावणीचे शुटिंग झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने कडक कारवाईची मागणी केली असून संबंधितांनी सर्व शिवप्रेमी महाराष्ट्राची जाहिर माफी मागावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले होते. नृत्यांगना वैष्णवी ही लाल महालात चंद्रा या गाण्यावर थिरकली होती. त्यावरूनच मोठे वादंग झाले होते. या वादानंतर वैष्णवी पाटीलने माफी मागितली. या अक्षम्य अपराधामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.