दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
एकतर्फी प्रेमातून कॉलेजसमोरून तरुणीला ओढत नेत हत्या केल्याची शहराला हादरवणारी घटना आज दुपारी देवगिरी महाविद्यालय परिसरात घडली आहे. ग्रंथी सुखप्रीत कौर असे मृत तरुणीचे नाव आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने शहरात पोलिसांचा धाक राहिला आहे का? असाच प्रश्न पडतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थीनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली आहे. दुपारी तरुणी महाविद्यालयाबाहेर आली असता एक तरुण तिथे आला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर तरुणीस कॉलेजसमोरून २०० फुट ओढत नेत तरुणाने तिला चाकूने भोसकले. हा धक्कादायक प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याची माहिती आहे. भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली असून त्याच्या अटकेसाठी पथक रवाना झाले आहे. शरण सिंग असे संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती मिळत आहे.
