दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
आदिवासी भागात काळजाला भेडसावणाऱ्या समस्या कायम
मोखाडा:-पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या सावटपाडा येथील ग्रामस्थांनी वाघ नदीवर पूल बांधण्याची मागणी केली असल्याची माहिती दिनांक 21 मे वार शनिवार रोजी मिळत आहे. काशीराम चिबडे,गणपत जाधव, राजू भोगाडे,निब्या चिभडे,किसन जाधव,सुरेश जाधव,रमेश पढेर,तुळशीराम चिभडे,संदीप चिभडे,मोहन गोविंद,सखाराम भोगाडे,रामू भोगाडे,नरेश पढेर आदि ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे.जव्हार तालुक्यातील न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये सावट पाडा व सांबर पाडा या गावाच्या मध्ये असणाऱ्या वाघ नदीवर पूल बांधण्याची मागणी केलेली आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहे तरी येथील ग्रामस्थ पुलाच्या प्रतीक्षेत आहेत ही खरंच प्रगत महाराष्ट्राची शोकांतिका आहे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे सावटपाडा गावात अजून कुठलाही रस्ता नाही जवळजवळ तिन ते चार किलोमीटर चालत जाऊन इतर गावाशी संपर्क साधला जातो. पावसाळ्यात कुठलेच वाहन या ठिकाणी जात नाही अशीही माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे.या गावातील लोकांना रेशन किंवा कुठलेही साहित्य आणायचे झाले तर नदी पार करावी लागते अन्यथा दुर ३ ते ४ किलोमीटर अंतर कापून दुस-या गावाशी संपर्क साधावा लागतो.तीनशे आदिवासी लोकवस्तीच्या सावर पाड्यावर सोयीसुविधांचा देखील अभाव असल्याचं या ठिकाणच्या ग्रामस्थांचे म्हणणे असून नदी बारमाही वाहत असल्याने ती पार करूनच दुसऱ्या गावाशी संपर्क साधला जातो अन्यथा दूर तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन चालत जाऊन दुस-या गावाशी संपर्क साधावा लागतो.रेशन दुकान वरचे धान्य आणण्यासाठी सुध्दा बारमाही नदी पार करावी लागते.माध्यमिक शाळेतील मुलांना नदीत पोहुन शाळा गाठावी लागते असेही येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ्याची तजवीज म्हणून चार महिन्याचे धान्य प्लास्टिकच्या पिशवीत बांधून मोठ्या शिताफीने नदी पार करावी लागते. हे करत असताना जीवही मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो असे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. तर आजारी माणसाला डोली करुन न्यावे लागते. गरोदर मातांना तपासणी करण्यासाठी न्याहाळे बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते पण गरोदर मातांना पावसाळ्यात जाता येत नाही.राजकीय लोक येतात आश्वासन देऊन जातात पुल मंजूर आहे असेही सांगतात मात्र अजूनपर्यंत कोणीही ठोस उपाययोजना केली नसल्याची माहिती येथील ग्रामस्थ इतर ग्रामस्थांनी दिली आहे.सावटपाडा गरीब आदिवासी बांधवांची ही होणारी ओढाताण कोणी थांबवेल का असा प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहेत.
