
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे :महापालिकेच्या निधीतून जवळपास सर्वच नगरसेवकांनी विकासकामांची माहिती देणारे डिजिटल फलक लावले आहेत. यासाठी महापालिकेच्या पथदिवे अथवा स्वतंत्र मीटर घेऊन वीज वापरण्यात येत आहे. या चमकोगिरीचे बिल मात्र महापालिकेच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे, किमान निवडणुका होईपर्यंत तरी या फलकांची वीज तोडावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
शहरात प्रत्येक प्रभागात असे शेकडो फलक लागले असून त्यावर लाखोंचे बिल महापालिकेस मोजावे लागत आहे. पथदिवे, पुस्तकघर, बसथांबे, वाचनालये, ओपन जीम, रस्त्यावरील वेगवेगळी शिल्प, रस्त्यावर केलेली विकासकामे, स्वच्छतागृह, ज्येष्ठ नागरिक कट्टे, प्रार्थना स्थळे, सेल्फी पॉइंट अशा ठिकाणी हे संकल्पनांचे डिजिटल फलक लावण्यात आलेले आहेत.
महापालिकेस मागील वर्षी २९७ कोटींचा खर्च वीज बिलावर करावा लागला आहे. यामुळे पालिकेचे कंबरडे मोडले आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा विक्रमी वीज खर्च वाढला आहे. पुणेकर करदात्यांच्या पैशाची ही उधळपट्टी आहे थांबवावी ती अशी मागणी जोर धरत आहे.