
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : पुण्याच्या पिंपरी-चिंचवड मध्ये ह्रदयद्रवणारी एक घटना घडली आहे. एका आठ वर्षाच्या मुलाने अगोदर खेळातल्या बाहुलीला फाशी दिली आणि मग तोंडाला फडके बांधून स्वतःही फाशी घेतली. थेरगाव मध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कुटूंब नेपाळी असून ते एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये रहात आहे. त्यांना ३ मुले असून मोठा मुलगा ८ वर्षांचा आहे. वडील त्याच सोसायटी मध्ये वाॅचमन म्हणून काम करतात. मोबाईल मधील व्हिडिओ बघून मुलाने हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना घडली तेव्हा मुलाची आई घरातच काम करत होती. मुलगा खेळण्यात रमला आहे असे समजून आईने कामे हातावेगळी करून घ्यावी असा विचार करून कामांमध्ये ती व्यग्र झाली. नंतर खूप वेळ झाला मुलाचा आवाज येत नाही म्हणून आई मुलाला पहाण्यात खोलीत गेली. तर तीला हे भयंकर दृश्य दिसले. एका बाजूला बाहुलीच्या तोंडावर फडके बांधून तीला फाशी दिली होती तर त्याचबरोबर मुलगा फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने फाशीसाठी धुणे वाळत घालण्याच्या दोरीचा वापर केला होता. ह्या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळत व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अधिक तपास चालू आहे.