
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
राज्याचे भूमिपुत्र कॅप्टन अमोल यादव हे देशातील बनावटीचे पहिले प्रवासी विमान बनवण्याचा प्रयत्न करत असून त्यांना येथील गोंदूर विमानतळस्थळी शासकीय जमीन या प्रयोगासाठी प्राप्त झाली आहे.
त्यासाठी त्यांनी विविध टप्पे पूर्ण केले असून शासनाच्या विविध परवानगी प्राप्त केल्या आहेत. या प्रकल्पामुळे धुळ्याचा नावलौकिक सातासमुद्रापार जाणार आहे.
कॅप्टन यादव यांच्या या प्रयोगास शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने पाठबळ देण्याचे विचाराधीन असून त्या अनुषंगाने आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मंगळवारी (ता. ३१) या प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पाची पूर्ण माहिती कॅप्टन अमोल यादव यांच्याकडून जाणून घेतली. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या विकासासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत केली जात असून कॅप्टन यादव यांचेदेखील देशी बनावटीचे विमान बनवण्याचे कार्य हे निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरेल यासाठी समाज कल्याण विभागाकडून त्यांना सुमारे बारा कोटींच्या आर्थिक मदतीबाबत प्रस्ताव लवकरच शासनास सादर करण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. नारनवरे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.
कॅप्टन यादव यांच्या प्रयत्नातून लवकरच प्रायोगिक चाचण्यांनंतर व्यावसायिक उत्पादनास सुरवात व्हावी, अशा शुभेच्छाही आयुक्तांनी दिल्या. कॅप्टन यादव यांनी पाहणीवेळी आयुक्तांचे स्वागत केले. प्रादेशिक उपायुक्त डॉ. भगवान वीर, सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, कॅप्टन अमोल यादव यांचे बंधू रश्मिकांत यादव, विभागाचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ कॅप्टन अमोल शिवाजी यादव हे भारतीय बनावटीची विमाने बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
राहत्या घराच्या गच्चीवर बनवलेले सहाआसनी TAC ००३ या प्रकारचे विमान बनवण्यास त्यांना १९ वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये रिजनल कनेक्टिविटी अर्थातच जिल्हानिहाय विमानसेवा निर्माण करण्यासाठी कॅप्टन यादव विमान बनवण्याचे प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने धुळे एमआयडीसीमार्फत त्यांना गोंदूर विमानतळस्थळी विमान कारखाना बनवण्यासाठी जागा दिली आहे. कॅप्टन यादव यांनी बनविलेले सहा आसनी विमान पार्क करण्यासाठी गोंदूर विमानतळस्थळी दोन हजार फुटांचा एक हँगर बनविलेला आहे. त्यामध्ये TAC००3 हे सहा आसनी विमान पार्क केले आहे. तसेच विमान बनवण्याची सर्व प्रकारची सामग्री अमेरिकेहून आणली आहे