
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे: शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने पकडले. चोरट्याकडून दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरट्याने विश्रांतवाडी, धानोरी, वारजे भागातून दुचाकी लांबविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शांतप्पा विठ्ठल देसाई ( वय २१ , रा आकाश पार्क धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. धानोरी भागात पोलीस गस्त घालत होते. त्या वेळी देसाई दुचाकीवरुन जात होता. पोलीस कर्मचारी दिनकर लोखंडे, विनायक रामाणे यांनी दुचाकीवरील वाहन क्रमांकाची पाटी पाहिली आणि संशय आला. पोलिसांनी देसाईला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे उघडकीस आले.
चौकशीत देसाईने दुचाकी चोरीची कबुली दिली. देसाई आणि साथीदाराने विश्रांतवाडी, वारजे, हिंजवडी भागातून चार दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक निरीक्षक विवेक पाडवी, उपनिरीक्षक गुंगा जगताप, उदय काळभोर, सुदेश सपकाळ यांनी ही कारवाई केली.