दैनिक चालु वार्ता भिगवण प्रतिनिधी:जुबेर शेख
भिगवन : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपाच्या प्रवक्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे दूरगामी व गंभीर परिणाम होताना दिसत आहेत.जगभर याचे पडसाद उमटत आहेत,अशा वादग्रस्त विधानांमुळे जातीय तेढ व तणाव निर्माण होत आहे
या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवार (दि.१३) रोजी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.या शिस्तबद्ध व शांततामय मूक मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला.
भिगवण व भिगवण परिसरातील मुस्लिम समाजाच्या वतीने येथील पोलिस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन देऊन मुस्लीम समाजाच्या सामाजिक भावना भडकावणार्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंदू मुस्लिम एेक्याचे दर्शन
या मुक मोर्चा मधे मोठ्या प्रमाणात मुस्लिम तसेच हिंदू बांधव देखील उपस्थित होते.
हा मूक मोर्चा भिगवण येथील मस्जिद येथून सुरू होऊन ग्रामपंचायत कार्यालय, मेन पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भैरवनाथ विद्यालय, जि.प. प्राथमिक शाळा मार्गे पोलिस स्टेशन पर्यंत काढण्यात आला.
या मूक मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिगवण पोलिस स्टेशनकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी मुस्लिम समाज बांधव,ग्रामस्थ,सर्व पक्षीय पदाधिकारी,भिगवण व परिसरातील नागरिक,विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
