
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : नौदलातून निवृत्त झालेल्या INS विक्रांत या युद्धनौकेचं स्मारक बनवण्यासाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला होता. या पैशांचा तपशील आता मुंबई हायकोर्टानं पोलिसांकडून मागितला आहे.
या प्रकरणी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यानं केस दाखल केली आहे
याप्रकरणी हायकोर्टानं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला एक प्रतिज्ञापत्र सादर करायला लावलं आहे. ज्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र यांनी INS विक्रांत वाचवा या अभियानांतर्गत किती पैसे गोळा केला त्याच्या तपशील द्यावा, असं म्हटलं आहे. सोमय्या पिता-पुत्रानं या मोहिमेतून सुमारे ५८ कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता. आयएनएस विक्रांत या युद्धानौकेनं सन १९७१ च्या युद्धात मोठी कामगिरी बजावली होती.
दरम्यान, याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्राविरोधात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यानं तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, सोमय्यांनी सन २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी निधी गोळा केला होता. त्यावेळी मी २००० रुपये देणगी दिली होती. पण याची पावतीही आम्हाला दिली नाही. उलट आम्हाला ही माहिती मिळाली आहे की, अशा प्रकारे अनेक जणांकडून गोळा केलेले पैसे पुढे राज्यपालांच्या कार्यालयाकडे पाठवलेच गेले नाहीत. ही युद्धनौका सन २०१४ मध्ये निवृत्त झाली. त्यानंतर तिची भंगारात विक्री करण्यात आली आणि तिची भागही सुटे करण्यात आले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सोमय्यांना या प्रकरणावरुन टार्गेट केलं होतं. राऊत यांनी म्हटलं होतं की, राजभवनाकडे आम्ही या निधीबाबत माहिती मागवली तेव्हा हे पैसे राजभवनाकडे पोहोचलेच नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळं राऊत यांनी या पैशांचा सोमय्यांनी अपहार केल्याचा गंभीर आरोप केला होता.