
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
दोन्ही जीवलग मैत्रीणी ठार तर एक युवक गंभीर
गडचांदूर/
राजुरा ते गडचांदूर मार्गावरील खामोना गावाजवळील घटना
सास्ती : परीक्षा देण्यास निघालेल्या दोन युवतींना राजुरा- गडचांदुर मार्गावर खामोना-आर्वी गावा दरम्यान अज्ञात वाहनाने चिरडून झालेल्या अपघातात दोन्ही युवतींचा मृत्यू झाला तर एक युवक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी १२ वाजता घडली. सगुणा भिवसन झाडे व अंजली नंदलाल मेश्राम दोन्ही रा. निंबाळा अशी मृत तरुणींची नावे असून जखमी यूवकाचे नाव वृत्त लीहेपर्यंत कळु शकले नाही.
प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील महाविद्यालयात बि.ए. प्रथम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थीनी याठिकाणी परीक्षेचे केंद्र नसल्याने आपल्या दुचाकी वाहनाने राजुरा येथील महाविद्यालयात पेपर देण्यासाठी निघाल्या परंतु काळाने घाला घातला आणि उच्च शिक्षणाचे त्यांचे स्वप्न क्षणार्धात विखुरले गेले.
राजुरा- गडचांदुर मार्गावर खामोना-आर्वी गावा दरम्यान त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक बसली धडक बसताच दोघेही रस्त्याच्या मधोमध पडले आणि पाठीमागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहन त्यांना चिरडून गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील युवक रस्त्याचे बाजूला पडल्याने थोडक्यात बचावला असून गंभीर जखमी झाला. दोन्ही जिवलग मैत्रिणीचा अश्यारीतीने एकत्रित मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केल्या जात असून अपघाताची माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई करीत वाहतूक सुरळीत केली.